Ad will apear here
Next
कुलाबा किल्ल्याची समुद्रसफर
फोटो : Kokansearch.com

प्रत्येक ठिकाणचा निसर्ग वेगळा असतो, त्याचं स्वतःचं वैशिष्ट्य असतं. काही ठिकाणांना लक्ष वेधून घेणारं सौंदर्य लाभलेलं असतं. काही ठिकाणं मात्र आकर्षक असली, तरी प्रत्यक्ष त्या ठिकाणांपेक्षाही तिथं जाण्याचा प्रवासच जास्त रंजक असतो. अलिबागच्या कुलाबा किल्ल्याला भेट दिलीत, तर हा अनुभव नक्कीच येईल. ‘चला, भटकू या’मध्ये आज कुलाबा किल्ल्याची समुद्रसफर... 
...........
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करताना फक्त भूभागावरच नाही, तर समुद्रावरही आपली सत्ता असायला हवी, असा दूरदृष्टीचा विचार केला होता. शिवरायांनी काही जलदुर्ग बांधले, तर काही आधीचे जलदुर्ग ताब्यात घेऊन त्यांची डागडुजी केली आणि ते स्वराज्यात सामील करून घेतले. अलिबागचा कुलाबा हा असाच वैशिष्ट्यपूर्ण जलदुर्ग.

सरखेल कान्होजी आंग्रे यांच्यासारख्या पराक्रमी दर्यावर्दी वीराने समुद्रावर हुकूमत गाजवली. अनेक वर्षं कान्होजी आंग्रे यांनी डच, पोर्तुगीज, इंग्रज अशा शत्रूंना समुद्रात सळो की पळो करून सोडले होते. अलिबागच्या कुलाबा किल्ल्यावरही कान्होजींची सत्ता होती. समुद्रातल्या एका मोठ्या खडकावर बांधलेला हा जलदुर्ग अलिबागच्या किनाऱ्यापासून अवघ्या एक ते दोन किलोमीटर अंतरावर आहे. कोकणच्या किनारपट्टीवर असलेल्या अन्य जलदुर्गांमध्ये जाण्यासाठी होडीनं जावं लागतं; पण कुलाब्याचं वैशिष्ट्य असं, की समुद्राच्या ओहोटीच्या वेळी त्यात चालत किंवा घोडागाडी, बैलगाडीनंही जाता येतं. अलिबागच्या किनाऱ्यावरून कुलाबा किल्ल्याकडे भरतीच्या वेळी बघितलं, तर एवढ्या पाण्यातून आपण पलीकडे कसं जाणार, असाच विचार मनात येतो. कारण भरतीच्या वेळी लाटा जवळपास बाहेरच्या रस्त्याला लागून असलेल्या धक्क्यापर्यंत धडक मारत असतात; मात्र काही तासांतच निसर्ग चमत्कार दाखवतो आणि पाणी ओसरतं. समुद्र खूप आत जातो. या वेळी कुलाबा किल्ल्याकडे जाण्याचा रस्ता स्वच्छ दिसू लागतो. काही ठिकाणी पूर्णपणे वाळू वर येईल, इतपत पाणी ओसरतं; पण बाकी ठिकाणी गुडघ्यापर्यंत पाणी असतं. समुद्रातून वाट काढत, किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी काही सुरक्षित मार्ग आहेत. काही ठिकाणी मात्र समुद्र खोल असल्यामुळे तिथून जाणं धोकादायक असतं. किल्ल्यापर्यंत जाणं सोपं असलं, तरी स्थानिक मार्गदर्शकांच्या देखरेखीखाली आणि ठरलेल्या मार्गानंच समुद्रातून वाट काढणं कधीही योग्य. समुद्राशी केलेला खेळ कधीही महागात पडू शकतो. चालत जायचं नसेल, तर किनाऱ्यावरून किल्ल्यापर्यंत नेण्यासाठी इथं घोडागाड्याही आहेत. समुद्र असला, तरी त्याची वाळू एवढी घट्ट आहे, की घोडागाडी त्यावरून सहज पळू शकते.

१७ बुरुज असलेल्या या किल्ल्याची लांबी ९०० फूट, रुंदी ३५० फूट व तटबंदीची उंची २५ फूट आहे. आज तीनशे वर्षांहून जास्त काळ तो सागराच्या लाटांचा सामना करत दिमाखानं उभा आहे. समुद्राला पूर्ण भरती आल्यावर किल्ल्याच्या चारही बाजूंना पाण्याच्या प्रचंड लाटा उसळतात. तरीही मुख्य प्रवेशद्वारापासून सुमारे १५ फुटांपर्यंत भरतीचं पाणी पोहोचत नाही. किल्ल्याला पुढे आणि मागे, अशी दोन भव्य प्रवेशद्वारं आहेत. किल्ल्यावर १७५९ साली राघोजी आंग्रे यांनी उभारलेलं सुरेख गणपती मंदिर असून, त्यातली सिद्धिविनायकाची मूर्ती उजव्या सोंडेची आहे. गाभाऱ्यात अष्टभुजा देवी, श्री शंकर, सूर्य, विष्णू यांच्या अतिशय सुंदर मूर्ती आहेत. या मूर्तींच्या एकत्रीकरणामुळे हे ‘श्री गणेश पंचायतन’ म्हणून ओळखलं जातं. किल्ल्यामध्ये दगडी बांधकामाचा गोड्या पाण्याचा एक तलाव आहे, तसंच गोड्या पाण्याची एक विहीर आहे. किल्ल्यातील एका बुरुजावर गाड्यावर चढवलेल्या उत्तम स्थितीतल्या दोन तोफा आहेत. किल्ला बघून झाला, की अलिबाग शहराची सैर करायलाही हरकत नाही. अगदी शांत, प्रसन्न आणि समुद्राकाठच्या या शहरात फिरण्याची मजा काही वेगळीच आहे. अलिबाग बसस्थानकापासून जवळच सरखेल कान्होजी आंग्रे यांची समाधी आहे. त्यांच्या कुटुंबातल्या अन्य काही जणांची समाधीही तिथे आहे.

फोटो : Nagaonbeach.inअलिबागचा किनारा तर उत्तम आहेच; पण त्यापेक्षाही आक्षी-नागाव, किहीम, काशीद, हे जवळपासच्या १५ ते २० किलोमीटरच्या अंतरावर असलेले समुद्रकिनारे अधिक आकर्षक आहेत. नारळापोफळीच्या बनांतून जाणाऱ्या रस्त्यांचा आनंद घेत, सोसाट्याचा वारा खात आणि समुद्राची गाज ऐकत आपण या किनाऱ्यांपर्यंत पोहोचतो. त्या ठिकाणचा निसर्ग मन मोहून टाकतोच, शिवाय फोटोग्राफीची आपली हौसही भागवतो. या भागात अनेक हिंदी-मराठी चित्रपटांची चित्रीकरणंही सुरू असतात. समुद्राच्या किनाऱ्यावरच अनेक रिसॉर्ट आणि हॉटेल्स आहेत. तिथे राहून संध्याकाळी, रात्रीच्या वेळी किनाऱ्यावर फेरफटका मारण्याचा आनंदही भन्नाट. पावसाळा संपला आहे आणि आता किनाऱ्यांवरचं वातावरणही आल्दाददायक असतं. अशा वेळी या किनाऱ्यांना भेट देण्याची मजा काही वेगळीच.
अलिबाग स्थानकापासून सुमारे १७ किलोमीटर अंतरावर असलेल्या चौल गावातलं दत्तमंदिर आणि पुरातन असं शीतलादेवी मंदिरही आवर्जून पाहण्यासारखं आहे. स्वतःचं वाहन असल्यास थेट मंदिरापर्यंत जाता येतं.

कसं जायचं?
मुंबईपासूनचं अंतर १०० किलोमीटर. ‘गेटवे ऑफ इंडिया’वरून जलमार्गानं बोटीनंही अलिबागला पोहोचता येतं. रस्त्यानं मात्र पनवेल-पेणमार्गे अलिबाग असा तीन तासांचा प्रवास करावा लागतो. मुंबईहून पनवेलपर्यंत लोकलनं जाऊन नंतर पेणमार्गेही अलिबाग गाठता येऊ शकतं. पुण्याहून जायचं, तर पनवेल किंवा खोपोलीमार्गेही जाता येतं. 

- अभिजित पेंढारकर
ई-मेल : abhi.pendharkar@gmail.com

(लेखक चित्रपट, दूरचित्रवाणी, कला आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत.)

(‘चला, भटकू या’ हे सदर दर बुधवारी प्रसिद्ध होते.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZYVBH
Similar Posts
अभेद्य जंजिरा किनाऱ्यापासून अगदी जवळच असूनही समुद्रातल्या थरारक प्रवासाची अनुभूती देणारा आणि अनेकविध वैशिष्ट्यं असलेला अभेद्य जलदुर्ग म्हणजे रायगड जिल्ह्यातला जंजिरा. ‘चला भटकू या’मध्ये आज करू या जंजिऱ्यावर स्वारी...
गर्द राईचं फणसाड दोन दिवसांच्या निवांत विश्रांतीसाठी, विशेषतः उन्हाळ्यात जवळच कुठेतरी जायचं असेल, तर समुद्रकिनाऱ्यांना पहिली पसंती असते; मात्र कधीकधी वेगळी ठिकाणंही हवीशी वाटतात. कृत्रिमरीत्या निर्माण केलेल्या रिसॉर्टपेक्षा मग नैसर्गिक वातावरणातली साधीसुधी ठिकाणं खुणावू लागतात. फणसाड अभयारण्य हा असाच एक जवळचा आणि मस्त पर्याय
अलिबाग परिसराचा फेरफटका ‘करू या देशाटन’ सदराच्या मागील भागात आपण रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीच्या उगमपासूनचा सह्याद्रीला लागून असलेला पाली परिसर पाहिला. आजच्या भागात पाहू या कुंडलिका नदी सागराला मिळते तेथून उत्तरेकडे असलेला पर्यटकांचा आवडता अलिबाग परिसर.
दक्षिण काशीची आनंदवारी आपल्या देशात समुद्रकिनाऱ्यावर असलेली सगळीच देवळं बघताक्षणी मोहून टाकणारी, कुणाच्याही मनात भरणारी आहेत. देवावर विश्वास असो किंवा नसो, तिथे येणाऱ्या प्रत्येकाला या देवळांची रचना, तिथलं निसर्गसौंदर्य बघून भारावून जायला होतं. ही देवळं, इथला परिसर खऱ्या अर्थाने मानसिक शांतता देतात, भरपूर समाधान देतात. कोकणात

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language